कोकणासह राज्यभरात चांगलाच पाऊस कोसळत आहे. दरम्यान पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत महत्वाचे समजले जात आहे. पुढील २४ तासांमध्ये कोकणात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने नागरिकांना योग्य ते खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोकण किनारपट्टीवर सुमद्राला उधाण आलेले आहे. किनारी भागातील आणि महत्वाच्या भागात एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर वाढल्यास समुद्र अजून खवळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी देखील काल रात्रीच्या सुमारास इशारा पातळीच्या जवळपास वाहत होती. नदीचे पाणी सखल भागात शिरले होते. शहरातील अनेक सखल पाणी साठले होते. मात्र रात्री पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याने सध्या चिपळूणवरील पुराचे संकट टळले आहे.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. तळकोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कोकणातील तीनही जिल्ह्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुडाळ येथे पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.