राज्यात लवकरच विधानपरिषद निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी ११ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत २०२२ प्रमाणे देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार याकडे सवांचे लक्ष लागले आहे.
२०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या कमालीच्या नियोजनामुळे जास्तीचा उभा केलेला उमेदवार निवडून आणला होता. दरम्यान आताच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने फडणवीसांवर एक मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. पहिल्या, दुसऱ्या पसंतीची मते कशी द्यायची याचे मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस सर्व महायुतीच्या आमदारांना करणार आहेत. आपापला उमेदवार निवडणून आणण्याऐवजी महायुतीचे उमेदवार जिकंण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले आहेत. भाजपाने ५ उमेदवार तर शिवसेनेने व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.