राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. तर अजित पवारांना ४ पैकी एकाच जागेवर यश मिळाले होते. दरम्यान अजित पवार यांनी सर्व आमदारांसह आज सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले आहे. येत्या निवडणुकीत आम्हाला यश मिळूदेत अशी प्रार्थना त्यांनी बाप्पाकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सिद्धिविनायक मंदिरात अजित पवार सर्व मंत्री आणि खासदार आमदार देखील उपस्थित होते.
आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीसाठी चांगले यश मिळू यासाठी सिद्धिविनायक बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे. यावेळी महत्वाचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. सुनील तटकरे , अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाची पुढील वाटचाल आणि प्रचाराची दिशा यावर चर्चा करण्यात आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले आहेत. भाजपाने ५ उमेदवार तर शिवसेनेने व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
राज्यात लवकरच विधानपरिषद निवडणूक होणार आहे. १२ जुलै रोजी ११ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सत्ताधारी आणि विरोधक आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत २०२२ प्रमाणे देवेंद्र फडणवीसांची जादू चालणार याकडे सवांचे लक्ष लागले आहे.