पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मॉस्कोला पोहोचले आहेत. आज दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्को येथील भारतीय समुदायाला संबोधित देखील केले आहे.
भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ” मी आज येथे एकटा आलो नाही तर माझ्यासोबत देशाच्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे. ते म्हणाले की, मी 140 कोटी देशवासीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. आपल्या नवीन कार्यकाळाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, आज 9 जुलै आहे, गेल्या महिन्यात याच दिवशी मी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. अशा प्रकारे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन एक महिना झाला आहे.”
आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा उल्लेख करताना, पीएम मोदींनी विशेषत: 3 क्रमांकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ”तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मी तिप्पट वेगाने काम करेन. पंतप्रधान म्हणाले, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे ध्येय आहे. गरिबांसाठी 3 कोटी घरे आणि 3 कोटी लखपती दीदी हे आमचे लक्ष्य आहे. भारत जे काही ठरवतो ते करतो. भारताची प्रतिभा पाहून जग थक्क झाले आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम भारतात आहे. भारत डिजिटल व्यवहाराचे सर्वोत्तम मॉडेल जगाला देत आहे.”
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सदाबहार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मी आभारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालत आहेत. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्यावरील लाल तोसी रशियन गाण्याचाही त्यांनी उल्लेख केला. पीएम म्हणाले की हे गाणे जुने झाले असेल पण भावना अजूनही नवीन आहेत. जुन्या काळात, राज कपूर, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांनी भारत-रशिया मैत्री मजबूत केली आणि सिनेमाने ती पुढे नेली. आता तुम्ही सर्वजण भारत-रशिया संबंध मजबूत करत आहात. पीएम मोदी म्हणाले की, आमच्या मैत्रीची अनेक वेळा परीक्षा झाली आहे आणि प्रत्येक वेळी आमची मैत्री अधिक घट्ट झाली आहे. भारत-रशिया मैत्रीबद्दल मी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचेही कौतुक करतो. दोन दशकांहून अधिक काळ ही मैत्री घट्ट करण्यासाठी त्यांनी अप्रतिम काम केले आहे.