अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.या गोळीबार प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणीच नेटवर्क मजबूत करण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता.अशी माहिती समोर येत आहे.मुंबई पोलिसांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या आरोपपत्रात सलमान खानच्या वक्तव्याचा तपशीलही देण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेबाबत सलमानने म्हटले आहे की, मला आणि कुटुंबाला खोटे लक्ष्य केले जात आहे.या सर्व गोष्टी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी केल्या जात असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.तसेच यापूर्वी आपल्याला मिळालेल्या धमक्यांचाही त्याने उल्लेख केला आहे. .
या सगळ्या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सोमवारी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले.मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, राज्यात बिष्णोई गँगला खंडणीच रॅकेट वाढवायचे होते. खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे.
सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न दिसतोय असा जबाब दिला आहे. बिश्नोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझे कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत असेही सलमानने मुंबई पोलिसांना जबाबात सांगितले आहे.