आसाममधील पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील ३५ पैकी २९ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.
यावर्षी आतापर्यंत पूर, भूस्खलन आणिअतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या 85 वर पोहोचली असून त्यात सोमवारी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या आसाममधील स्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे, मात्र अजूनही 18.80 लाख लोकांना पुराच्या पाण्यामुळे बाधित आहेत. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यात सतरा प्राण्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला आहे . वन विभागाच्या प्रयत्नांमुळे ७२ पेक्षा अधिक प्राण्यांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र ब्रह्मपुत्रासारख्या काही मुख्य नद्या अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.
आसाममधील सद्यस्थितीबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी पुरामुळे बाधित झालेल्या 22.75 लाख लोकांच्या तुलनेत 27 जिल्ह्यांमध्ये 18.80 लाख लोक बाधित झाले. पुरामुळे धुबरी या गावाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे 4.75 लाख लोकांना पुराच्या पाण्यात राहावे लागत आहे. याशिवाय कचरमध्ये 2.01 लाख आणिबारपेटामध्ये 1.36 लाख लोक बाधित झाले आहेत.पूरग्रस्तांसाठी प्रशासनाने 25 जिल्ह्यांमध्ये 543 मदत शिबिरे आयोजित केली आहेत. या छावण्यांमध्ये 3,45,500 लोक राहत आहेत.नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) आणि एसडीआरएफसह विविध एजन्सीद्वारे बाधित भागात बचाव कार्य केले जात आहे.
गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले की,आसाम आणि आसपासच्या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा धोका आहे.
येत्या 25 तासांत अरुणाचल प्रदेश,आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
निमतीघाट, तेजपूर, गुवाहाटी आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे.धोक्याचे चिन्ह ओलांडणाऱ्या नद्यांमध्ये बडतीघाट येथील सुबनसिरी, चेनिमारी येथील बुर्हिडीहिंग, शिवसागर येथील दिखाऊ, नांगलामुराघाट येथील दिसांग, धरमतुल येथील कोपिली, बीपी घाट येथील बराक, गोलोकगंज येथील संकोश आणि करीमगंज येथील कुशियारायांचा समावेश आहे. राज्यातील अनेक भागात रस्ते,पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.