वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल ४८ तासानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मुंबई गुन्हे शाखेने शहापूरमधून अटक केली आहे. तसेच मिहीर शाहची आई आणि त्याची बहीण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबरोबरच आरोपीला मदत करणाऱ्या १२ जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिहीर शाहने वरळी येथे भरधाव वेगाने गाडी चालवत एका दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मिहीर शाह फरार झाला होता. पोलिसांनी गाडीचा चालक आणि आरोपीचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. मात्र शिवडी कोर्टाने आरोपीच्या वडिलांना १५ हजार रुपये रोख रकमेवर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान मिहीर शाह याच्याविरोधात आता लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. मिहीर शाह ४८ तासांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी ६ पथके पोलिसांनी तयार केली असून अत्यंत वेगाने त्याचा शोध सुरु होता. दरम्यान आरोपी परदेशात पलायन करणार असल्याचा संशय पोलिसांना होता. पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता वरळीमध्ये देखील हिट अँड रन अपघात घडला आहे. एका बीएमडब्ल्यू गाडीने गेलेल्या एका कुटुंबाला उडवले आहे. या अपघातामध्ये नवरा थोडक्यात वाचला आहे. तर बायकोचा म्हणजेच महिलेचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न झुगारता कारवाई पोलिसांनी करावी असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे ते म्हणाले आहेत.