पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी मॉस्कोला पोहोचले आहेत. आज दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. याआधी पुतिन आणि पंतप्रधान मोदी दोघांची वैयक्तिक भेट झाली. यावेळी मास्को येथे मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतासाठी ही अत्यंत गौरवशाली बाब आहे.
मास्को येथे पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’ हा रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. मला मिळालेला पुरस्कार हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.
https://x.com/BJP4India/status/1810669926539256119
भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ” मी आज येथे एकटा आलो नाही तर माझ्यासोबत देशाच्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे. ते म्हणाले की, मी 140 कोटी देशवासीयांचे प्रेम घेऊन आलो आहे. आपल्या नवीन कार्यकाळाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, आज 9 जुलै आहे, गेल्या महिन्यात याच दिवशी मी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. अशा प्रकारे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन एक महिना झाला आहे.”
आपल्या तिसऱ्या कार्यकाळाचा उल्लेख करताना, पीएम मोदींनी विशेषत: 3 क्रमांकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ”तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मी तिप्पट वेगाने काम करेन. पंतप्रधान म्हणाले, भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे ध्येय आहे. गरिबांसाठी 3 कोटी घरे आणि 3 कोटी लखपती दीदी हे आमचे लक्ष्य आहे. भारत जे काही ठरवतो ते करतो. भारताची प्रतिभा पाहून जग थक्क झाले आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम भारतात आहे. भारत डिजिटल व्यवहाराचे सर्वोत्तम मॉडेल जगाला देत आहे.”