कोकणासह राज्यभरात चांगलाच पाऊस कोसळत आहे. दरम्यान पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत महत्वाचे समजले जात आहे. पुढील २४ तासांमध्ये कोकणात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने नागरिकांना योग्य ते खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आजही कोकण रेल्वे ठप्प झाली. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसताना दिसत आहे.
गोव्यावरून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशी अडकून पडले आहेत. पडणे बोगद्यात रुळावर पाणी आल्याने सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. काल संध्याकाळपासून कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याचा गाड्या दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
कोकण किनारपट्टीवर सुमद्राला उधाण आलेले आहे. किनारी भागातील आणि महत्वाच्या भागात एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर वाढल्यास समुद्र अजून खवळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी देखील काल रात्रीच्या सुमारास इशारा पातळीच्या जवळपास वाहत होती. नदीचे पाणी सखल भागात शिरले होते. शहरातील अनेक सखल पाणी साठले होते. मात्र रात्री पावसाचा जोर थोडासा ओसरला असल्याने सध्या चिपळूणवरील पुराचे संकट टळले आहे.