राज्याच्या विधानसभा अधिवेशनाचा आजचा दिवस प्रचंड वादळी ठरला. काल राज्यसरकारने मराठा आरक्षणावरून सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला विरोधी पक्षांनी उपस्थिती दर्शवली नाही. त्यावरून आज सभागृहात सत्ताधारी पक्षांनी हा विषय उचलून धरला. विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांना हा मुद्दा सोडवायचा नसून, मुद्दा तसाच ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यानंतर विरोधकांनी विधानपरिषदेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.
ओबीसी आणि मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विरोधकांनी हजेरी न लावल्याने सत्ताधाऱ्यानी गोंधळ घातला. दरम्यान विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह तहकूब केले. तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विधानपरिषेदत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील सभागृह तहकूब केले. विधानपरिषदेतील परिस्थिती पाहून नीलम गोर्हे यांनी मार्शल्सना पाचारण केले. मात्र त्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरुच राहिला. त्यानंतर नीलम गोर्हे यांनी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले आहे.