काल टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती झाल्यानंतर, बीसीसीआय माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) आणि लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji) यांचा राष्ट्रीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
झहीरने 92 सामन्यांमध्ये 311 कसोटी बळी घेतले आहेत आणि 309 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मेन इन ब्लूसाठी एकूण 610 विकेट्स घेतल्या आहेत. तो क्रिकेट खेळणाऱ्या महान डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
तर बालाजीने आठ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे ज्यात त्याने 37.18 च्या सरासरीने 27 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, त्याने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.52 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर टीम इंडियासाठी नवीन सपोर्ट स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.
तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली होती.
गंभीर भारतीय संघासाठी डावखुरा सलामीवीर होता आणि त्याने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम केले. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली KKR ने या हंगामात तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती .
जय शाह यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये गंभीरच्या नियुक्तीची घोषणा करत म्हंटले आहे की “गंभीरवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी तो एक आदर्श व्यक्ती असेल.भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून @ गौतम गंभीर यांचे मी स्वागत करत आहे याचा खूप आनंद होत आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित होत आहे, आणि गौतम या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतविविध भूमिकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मला विश्वास आहे की गौतम हा भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे आणि त्याच्या या नवीन प्रवासाला बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा असेल”.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्याच्या समाप्तीनंतर संपुष्टात आला, जिथे भारताने 17 वर्षानंतर ही ट्रॉफी जिंकत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आहे .