वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांची शिवसेनेच्या शिंदे गटाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. यासोबतच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले की, याप्रकरणी सरकार मृतांच्या कुटुंबाप्रती पूर्णपणे संवेदनशील आहे. पीडित कुटुंबाला सरकार सर्व प्रकारची मदत करेल. मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याच्यावर दारू पिऊन गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत कावेरी नाखवा नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर शिवसेनेचे यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी आज जखमी प्रदीप नाखवा आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर शिवसेनेचे युबीटी नेते संजय राऊत म्हणाले होते की, आरोपी हा सत्ताधारी पक्षाचा उपनेता आहे, त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात दबावाखाली काम करावे लागत आहे.
यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने उपनेते राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेश शहा याला अटक केली होती, मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मिहिर शाह, त्याची आई आणि बहिणीसह 12 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.