दिल्लीमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजुकमार आनंद यांच्यासोबत त्यांची पत्नी वीणा आनंद, आम आदमी पक्षाचे छत्तरपूरचे आमदार करतार सिंग तंवर आणि नगरसेवक उमेश सिंग फोगट यांच्यासह रत्नेश गुप्ता, सचिन राय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी राजकुमार आनंद यांच्यासह या नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. दिल्लीत सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत राजकुमार आनंद यांचा भाजपमध्ये प्रवेश हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राजकुमार आनंद 2020 मध्ये पहिल्यांदा पटेल नगर मतदारसंघातून आमदार झाले. याआधी त्यांच्या पत्नी वीणा आनंद याही याच विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या जागी राजकुमार आनंद यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि आम आदमी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
राजकुमार आनंद म्हणाले की, भ्रष्टाचाराबाबत पक्षाच्या धोरणाशी ते सहमत नाहीत. त्याचवेळी दलित आमदार आणि मंत्र्यांना पक्षात मान मिळत नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. इतकंच नाही तर त्यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर खासदारकीची निवडणूकही लढवली पण त्यांना विजय मिळवण्यात यश आलं नाही. तेव्हापासून त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची अटकळ होती आणि आज त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली.
राजकुमार आनंद यांनी ‘आप’ सोडताना सौरभ भारद्वाज आणि संजय सिंह यांनी तपास यंत्रणांच्या छाप्यांमुळे घाबरल्याचे सांगितले होते. त्यामुळे दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने राजकुमार आनंदच्या अनेक ठिकाणी छापे टाकले होते. जेव्हा आप नेते म्हणाले की ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्यांनी बसपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांनी बसपा सोडून भाजपचा झेंडा घातला आहे.