पुण्यासाह देशातील काही भागांमध्ये झिका व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे पुढे येत असतानाच इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) झिका व्हायरस संदर्भात नवी मार्गदर्शकतत्त्वे (गाईड-लाईन्स) जारी केली आहेत. त्यानुसार डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांची झिका व्हायरसची देखील चाचणी केली जाणार आहे.
आयसीएमआरच्या गाईड-लाईन्सनुसार देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत हा आजार रोखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. झिका व्हायरस डासांच्या चावण्याने देखील पसरतो आणि हा व्हायरस पसरवणारे डास पावसात प्रजनन करू शकतात. यापार्श्वभूमीवर आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
यामध्ये राज्यांना सांगण्यात आले आहे की, डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांची झिका व्हायरसची चाचणी केली जाईल. झिका व्हायरसची लागण एडीज डास चावल्याने होते. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचाही प्रसार होतो. मात्र, डेंग्यूच्या तुलनेत झिका व्हायरसची लक्षणे सौम्य आहेत. या व्हायरसची लागण गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला होते.
हाव्हायरस पहिल्यांदा युगांडा येथे 1947 मध्ये आढळला होता. झिका व्हायरसची लागण झालेल्या 5 पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. व्हायरसने ग्रस्त लोकांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात. व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावे लागते. ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे.याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.