लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. भाजपाला ९, शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ १ च जागा जिंकता आली. दरम्यान सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यात लढत झाली होती. विनायक राऊत आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात लोकसभा निवडणुकीची लढत झाली. दरम्यान या लढतीत नारायण राणे विजयी झाले. आता माजी खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या खासदारकीला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मतदारांना धमकावून हा विजय प्राप्त करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी याचिकेतून केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी ४७ हजार पेक्षा जास्त मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला आहे. मात्र हा विजय पैशांच्या जोरावर झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत विनायक राऊतांनी मुंबई हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून राणेंनी विजय मिळविला असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. निवडणूक काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यामुळे आता या आयचिकेवर मुंबई हायकोर्टात काय सुनावणी होते व काय निर्णय येऊ शकतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.