“जो पर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तोपर्यंत यमाला सांग मला मरायला वेळ नाही !” असा साक्षात यमाला निरोप पाठवणारे, हिंदवी स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्य उभे करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजीमहाराजांचे शूर सरदार’, बाजीप्रभू देशपांडे!
छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व धाडसी मावळे म्हणा, सरदार म्हणा, एकापेक्षा एक सगळेच सरस होते. जणू एक एक वेगवेगळे पैलू घडवलेले ,आपल्या अद्वितीय शौर्याने चमकणारे ,हिरेच जसे , या सगळ्याचे ध्येय एकच.. हिंदवी स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप,सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला कवटाळणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी,तानाजी मालुसरे या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता.
पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे तसेच महाराजांना विशाळगडापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था करणे ही भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण तर पणाला लावलेच पण छत्रपती विशाळगडावर सुखरूप पोचले यासाठी कानात प्राण गोळा करणारे बाजीप्रभू म्हणजे रणचंडीचे जणू पुजारीच ..
१३ जुलै १६६० हा स्वराज्याच्या इतिहासातील एका अभूतपूर्व लढतीचा दिवस.”लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.” ही भावना प्रत्यक्षात जगणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे ,फुलाजी देशपांडे ,नरवीर शिवा काशिद तसेच बांदल सेना आणि असंख्य मावळे यांचा आज बलिदान दिन..या सर्वांच्या अभूतपूर्व पराक्रमाची कथा सांगणाऱ्या पावनखिंड लढतीला आज ३६४ वर्ष पूर्ण होत आहेत.
अफझल खान वधानंतर विजापुर दरबारात शिवरायांचा बदला घेण्यासाठी कोण सरदार मोहीमेवर जाऊ शकतो याचा शोध चालू होता. आणि सिद्धी जोहर ‘सलाबतखान’ हा किताब घेऊन ३५ हजार सैन्यानिशी स्वराज्यावर चाल करण्यासाठी सिद्ध झाला.सिद्धी जौहर विजापुरहुन कोल्हापुरमार्गे हजारोंचे सैन्य,घोडदळ,पायदळ,बाजारबुणगे,तंबु,शामियाने खजाना असं सारं घेऊन पन्हाळ्याच्या दिशेने आगकुच करु लागला.
२ मार्च १६६० ला शिवराय पन्हाळ्याला पोहचले होते.लागोलाग पाठलाग करत करत सिद्धी जौहर देखील पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहचला.आणि त्यांने किल्ल्याला कडक वेढा घातला.आता शिवाजीला शरण येण्याशिवाय पर्याय नाही आणि विजय आपलाच होणार असा विश्वास त्याला वाटु लागला होता.
इकडे शिवराय पन्हाळ्याच्या किल्ल्यात मुक्कामाला होते. आपल्या गुप्तहेर खात्याकडुन त्यांना या विजापुर मोहीमेची खडा न खडा माहीती मिळाली. शत्रुचा वेध घेत आपले डाव टाकत असत मात्र .वेढा फोडुन बाहेर कसे पडायचे हा प्रश्न सा-यांना चिंताक्रांत करत होता.दरम्यान पावसाळ्याचे दिवस होते आणि वेढा पडुन आता काही महिन्यांचा अवधी लोटला होता.
शिवाजीमहाराजांचे वकील गंगाधरपंत यांनी सिद्धीकडे जात शिवराय कसे घाबरले आहेत व ते आता तुम्हाला शरण येणार आहेत अशी बतावणी केली.उद्या रात्री शिवाजीराजे आपल्याला शरण येतील असेही गंगाधरपंत यांनी सिद्धीला पटवले .पंताच्या या बतावणीचा सिद्धीच्या सैनिकावर योग्य तो परिणाम झाला.शिवाजी आता शरण येणार ही बातमी सर्वत्र वा-यासारखी पसरली व वेढ्यामध्ये थोडीशी शिथिलता आली.
याच संधीच्या शोधात शिवराय होते.. पौर्णिमच्या रात्री शिवराय ठरल्याप्रमाणे बाजीप्रभु,फुलाजीप्रभु,शिवाकाशिद आणि इतर सहाशे सैनिकासह,दोन पालखीसह गडावरुन निघण्यास सज्ज झाले.जगदंबा देवीचे दर्शन घेऊन राजे आपल्या मावळयासह योजनेनुसार विशाळगडाकडे निघाले. मुसळधार पाऊस ,वीजांचा कडकडाट,अरुंद काट्याकुट्यांची पायलाट,पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ही सेना स्वराज्याच्या महानायकाला मृत्युच्या दाढेतुन सुरक्षित स्थळी पोहचविण्यास निघालेली होती.एका पालखीत शिवरायांची सवारी तर दुसरी हुबेहुब शिवरायांसारखा दिसणारा शिवा काशिद . शत्रु सावध झालाच तर त्याला हुलकावणी देण्यासाठी ही पालखी होती.अंधा-या रात्री जीवाची पर्वा न करता सर्वजण स्वराज्यासाठी काय वाटेल ते सोसण्यासाठी तयार होते.आपलं काही झालं तरी चालेल राजे सुखरूप विशाळगडावर पोचले पाहिजेत ह्याच एका भावनेने भारलेले मावळे झपझप पावले उचलत मार्गक्रमण करत होते.
शत्रु मागावर आला तर घात होईल.म्हणून काटेकुटे तुडवत..खाच खळगे,दगड गोटे कशाचीही पर्वा ना करता पावसात चिंब होत ही स्वराज्य सेना अखंड धावत होती. पायथा ओलांडला आणि मावळ्यांनी थोडा सुटकेचा निश्वास टाकला..पण अजुन विशाळगडाचं अंतर खुप होतं तेवढ्यात निरोप आला की शिवाजी राजांच्या वेशात दुसऱ्या पालखीत बसलेल्या शिवा काशिदला सिद्धीने ओळखले आणि स्वराज्यासाठी शिवा काशीदने प्राणांची आहुती दिली.
सिद्धीने आता मसुदखानाला घोडदळ घेऊन पाठलागावर पाठवले तोपर्यंत महाराज व सैनिक घोडखिंडीपर्यंत पोहचले होते. मात्र मागावर सिद्धीचे सैनिक मात्र होतेच.मग मात्र बाजीप्रभुंनी वडीलकीने शिवरायांना विशाळगडाकडे जाण्याची सुचना केली पण शिवरायांचा पाय हालत नव्हता.आतापर्यंत स्वराज्यासाठी अनेक वीराचे बलिदान शिवरायांच्या डोळ्यासमोर दिसत होते आणि .ही जीवाभावाची माणसे अशी शत्रूच्या हातात देऊन आपण पुढे जावे हे शिवाजीराजांना पटत नव्हते. पण बाजीप्रभु हट्टाला पेटले आणि त्यांनी शिवरायांना पुढे जाण्यास भाग पडले मात्र जाता जाता विशाळगडावर पोचल्यावर तोफांचे आवाज करा हे सांगायला विसरले नाहीत.
आणि मग निमुळत्या अशा खिंडीत सुरु झाला तो रणसंग्रांम.मसुद खान आणि त्याचे ताज्या दमाचे सैन्य मावळ्यांवर तुटुन पडले .बाजीप्रभु, व अन्य सहका-यांनी दगड गोटे,गोफण,तलवार,भाले ह्या सर्व साहित्यानिशी शत्रूला जेरीस आणायला सुरवात केली. .जो समोर येईल त्याच्या शरिराचे तुकडे पडत होते.बाजीप्रभु आपल्या दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन शत्रुबरोबर दोन हात करत होते.२१ मैलांचं अंतर कापत अनेक तासांचा अथक प्रवास करून सुद्धा मराठी फौज लढत होती.शत्रु सैन्याचे घाव छातीवर झेलत अक्षरशः ही स्वराज्य सेना शत्रुच्या छाताडावर नाचत होती.सैन्य जास्त असुनसुद्धा मसुद खानला काही सुचत नव्हते.
बाजीप्रभुचं रौद्ररुप पाहुन तर तो थक्कच झाला होता.आजपर्यंत असा अजेय योध्दा त्यांने पाहीलेला नव्हता. शत्रुसैन्य चढाई करत होते. .बाजीप्रभुंच्या देहाची अगदी चाळण झाली होती पण लढाई चालुच होती.आपलं सारी शक्ती कानात एकवटुन बाजीप्रभु संकेताची वाट पहात होते.शरिर क्षीण झाले होते. अनेक जख्मा होऊनसुद्धा त्यांचे त्वेषाने लढणे चालू होते. जणू मृत्यूही बाजीप्रभुंचा आवेश पाहून थबकला होता.
आणि घोडखिंडीत शत्रूला चुकवत शिवराय अखेरीस विशाळगडावर पोहचले तोफांच्या आवाजाने संकेत मिळाला आणि बाजीप्रभूंचे कान तृप्त झाले . त्वेषाने लढणारे बाजीप्रभु संकल्प पुर्तीच्या समाधानाने स्वराज्यासाठी समर्पित झाले. शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजी प्रभुंना जखम झाली नसावी पण त्यांना कसलेही भान नव्हते. .१८ तास निरंतर युद्ध करत बाजी प्रभू मातृभूमीला समर्पित होऊन गेले.
या लढाईनंतर घोडखिंडीचे नाव पावन खिंड झाले कारण कारण बाजी प्रभू आणि त्यांच्यासारख्या अनेक योद्धांच्या बलिदानाने , त्यांच्या पवित्र रक्ताने ती भूमी पावन होऊन गेली होती. शिवछत्रपतींच्या पन्हाळगड सुटकेपासून ते विशाळगडावर सुखरूप पोचेपर्यत बाजीप्रभू, फुलाजी देशपांडे आणि बांदल देशमुख , शिवा काशीद आणि शूर मावळे यांनी जीवाची पराकाष्ठा करत लाखांच्या पोशिंद्याला जणू पुनर्जन्म दिला तो स्वराज्य अबाधित राखण्यासाठी! ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही) आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला. त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या युद्ध गर्जनेने आणि शौर्याने गानिमही हादरला,अश्या बाजीप्रभू देशपांडे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा, वीर शिवा काशिद, वीर बाजीप्रभू देशपांडे,बांदल सेना आणि अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी अश्या अनेक लढायांमध्ये राष्ट्रहितासाठी आपले सर्वस्व महाराजांच्या चरणी वाहिले तेव्हा हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले ही जाणीव या लेखाच्या निमित्ताने जरी आपल्या प्रत्येकाच्या मनात जागती झाली तर ते या लढवय्यांना खरे अभिवादन ठरेल.
संकलन -रुपाली अनगळ-गोवंडे
संदर्भ -इंटरनेट