अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्यावर जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत म्हंटले आहे की “मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी खूप चिंतेत आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे होवो ही सदिच्छा”
या घटनेनंतर अमेरिकेचे विद्ममान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “ट्रम्प यांच्या सभेदरम्यान झालेल्या घटनेची मी माहिती घेतली आहे. सुदैवाने ट्रम्प सुरक्षित असल्याचे मला समजले. ट्रम्प यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी मी प्रार्थना करतो. अमेरिकेत अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नाही. एक देश म्हणून आपण एकत्र यायला हवे आणि अशा घटनांचा निषेध नोंदवायला हवा, असे बायडेन म्हणाले आहेत.
अमेरिकन वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाकडून आगामी निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करत गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करत एक गोळी गेली आणि ते बचावले.