अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल निवडणूक प्रचारसभेत हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने हल्लेखोराने झाडलेली गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
आता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या या व्यक्तीची ओळख पटवली आहे. हा अवघा २० वर्षीय तरुण असून थॉमस क्रुक्स असे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामागचा त्याचा हेतू आता पोलीस शोधत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करताच क्षणी सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात २० वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सचा मृत्यू झाला आहे तसेच घटनास्थळावरून एआर-15 सेमी ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे.
ट्रम्प ज्या ठिकाणावरुन भाषण देत होते, त्याच्या 120 मीटरवर एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच्या गच्चीवर हल्लेखोर जाऊन बसला होता . त्या ठिकाणावरुन त्याने डोनोल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ज्या ठिकाणी सभा होती, त्या ठिकाणी ओपन स्पेस होती. त्यामुळे हल्लेखोराला गोळी चालवण्यात काहीच अडचण आली नाही. तो गच्चीवरुन ट्रम्प यांना पाहू शकत होता, बटलर फार्म शो मैदानावरील स्टेजपासून १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर क्रूक्स लपून बसला होता. या मैदानाच्या दक्षिणेस ५० किमीवर बेथेल पार्क हे गाव आहे.मात्र या हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.ज्या बिल्डींगवर हल्लेखोराचा मृतदेह सापडला ती एजीआर इंटरनॅशनल कंपनीची आहे. या कंपनीत ग्लास आणि प्लास्टिक पॅकेजिंगचे उत्पादन केले जाते.
मात्र या सगळ्या घटनेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला प्रकरणात अमेरिकची गुप्तचर संस्था फेल ठरली असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती.हल्ला झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसचे कमांडो ट्रम्प यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांना सर्व बाजूंनी कव्हर करत सुरक्षितस्थळी नेण्यात आले.