राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे आहेत . घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. समुद्र सपाटीपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच जुलै अखेरपर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यातील दरडप्रवण अन् पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
हवामान खात्याने पुढील काही दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील काही दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या क्षेत्रातील सर्व धोकादायक स्थळांचा अभ्यास करून आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाय योजनासाठी कृती आराखडा तयार ठेवावा. असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडीच ते दिड तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या दीड तास उशीराने धावत आहेत. मंगलूर एक्स्प्रेस दोन तास तर तुतारी दोन तास उशिराने धावत आहे. मडगाव एक्स्प्रेस सद्धा दोन तास विलंबाने धावत आहे.
गेले २ दिवस मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. भिवंडीत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. भिवंडीतील भाजी मार्केट, नझराणा सर्कल, तीन बत्ती, मंडई, शिवाजी चौक या भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मुंबईतील काही ठिकाणी सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. भायखळा, लालबाग, परळ, दादर या भागात पाऊस मुसळधार सुरू आहे.