विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला असून अतिक्रमण त्वरित काढा यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशाळगड परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यसरकारने योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , “संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बाबत चर्चा झाली आहे. त्यांची जी मागणी आहे की, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यात यावे. गडावरचं अतिक्रमण काढून त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपले आहे अशी भूमिका शासनाची देखील आहे. फक्त विशाळगडच नाही तर प्रत्येक गड किल्ल्याबाबत शासन हाच विचार करत आहे. कायदेशीर आणि इतर बाबी तपासून विशाळगडाच्या अतिक्रमणाबाबत योग्य ती कारवाई केली जाईल,” अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.
राज्यामध्ये विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. गडावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात अनेक शिवप्रेमींनी आवाज उठवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून गड संवर्धन करणाऱ्या लोकांकडून आणि शिवभक्तांकडून या संदर्भात आंदोलन सुरु आहे. अगदी विधीमंडळासमोर देखील आंदोलन करण्यात आले आहे. विविध माध्यमांतून विशाळगड बचाओ अशी मोहिम घेण्यात येत आहे. विशाळगड अतिक्रमणाबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे आज विशाळगडावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. यानंतर अखेर राज्य सरकारने विशाळगड अतिक्रमण प्रकरणावर प्रतिक्रिया देत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
तर हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. संभाजीराजेंनी याबाबत राजकारण न करता राज्यातील सर्व गडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि विशाळगडावर अतिक्रमण प्रशासनाने काढावीत. अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच हिंदुत्ववादी संघटना मंदिर बांधतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी दिला आहे.