मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही महिने आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनानंतर राज्यसरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण दिले होते .मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 13 जुलै ही शेवटची तारीख दिली आहे. राज्य सरकारने 13 जुलैपर्यंत सगेसोयरेचा अध्यादेश बनवला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.तसेच डेडलाईन संपूनही हवे तसे आरक्षण न मिळाल्यामुळे जरांगे पाटील यांनी आता मोठी घोषणा केली आहे.
पुन्हा एकदा 20 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी आंतरवाली सराटीमधून दिला आहे.एकीकडे सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण हवे यासाठी पुन्हा 20 तारखेनंतर उपोषणाची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे यांनी आता ६ ते १३ जुलै दरम्यान राज्यात शांतता रॅली काढली होती. त्या रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरात समारोप झाला. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली वेळ संपली असून पुन्हा उपोषणावर बसणार असल्याची घोषणा केली आहे.