पुणे शहरात गेले काही दिवस पावसाने चांगलेच हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र अजून एका आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसचा प्रभाव पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण देखील वाढत आहे. पुणे शहरात झिका व्हायरसची संख्या २५ वर पोहोचली आहे. पुणे शहरानंतर आता कोल्हापूर आणि संगमनेर भागात देखील झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. गर्भवती महिलांना या आजाराचा धोका जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी 12 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्याचे वृत्त विचारात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी देशातील झिका विषाणूच्या स्थितीवर सातत्याने दक्षता बाळगण्याची स्थिती कायम राखण्याची गरज अधोरेखित करणारी मार्गदर्शक नियमावली राज्यांना जारी केली आहे.
झिकाचा संबंध लागण झालेल्या गरोदर स्त्रीच्या उदरातील गर्भामध्ये मेंदूची वाढीतील आणि मज्जासंस्थेतील दोष यांच्याशी असल्याने राज्यांना असा सल्ला दिला जात आहे की याबाबत सातत्याने देखरेख करण्यासाठी डॉक्टरांना सावध करावे. राज्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की विषाणूसंसर्गाने प्रभावित भागातील आरोग्य सुविधा केंद्रांना किंवा बाधित भागातील रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करावी, झिका विषाणूची लागण झालेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवावे आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावे, असे निर्देश द्यावेत. आरोग्य सुविधा/ रुग्णालये यांनी देखरेख करण्यासाठी आणि आपले संकुल एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याला तैनात करावे, असे निर्देश देखील राज्यांना देण्यात आले होते.