विशाळगडावरील अतिक्रमण काढले जावे यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली आहे. यासाठी काल त्यांनी गडावर जाण्याचा निर्धार केला. दरम्यान त्याआधी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मध्यरात्री कोल्हापुरात दाखल होत मुख्यमंत्र्यानी विशाळगडावर जाऊन पाहणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री विशाळगडाच्या पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. विशाळगडावरील घटनेची माहिती मिळताच ते कोल्हापुरात दाखल झाले.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी घेऊन काही शिवभक्त गडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दुसरीकडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे गडावरील व गडाखाली तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. कालच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.