भारत विरुद्व झिम्बॉबे यांच्यात टी-२० सिरीज सुरू होती. या सिरीजमध्ये भारताने झिम्बॉबेवर शानदार विजय मिळविला आहे. भारताने ही सिरीज ४-१ अशी आपल्या खिशात घातली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी राजधानी हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वे संघाचा ४२ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने झिम्बाब्वेला 6 गडी गमावून 168 धावांचे लक्ष्य दिले होते. टार्गेटचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांना 18.3 षटकात केवळ 125 धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांच्या तुफानी गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज टिकू शकले नाहीत. भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने अवघ्या 22 धावांत 4, शिवम दुबेने 2, तुषार पांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुदरने प्रत्येकी 1 बळी घेतला.
फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी ५६ चेंडूत ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. संजूने 45 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 4 षटकार आणि 1 चौकार लगावले. तर रियान परागने 22 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने 12 चेंडूत 22 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून डिओन मायर्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर तदिवनाशे मारुमणी आणि फराज अक्रम यांनी 27 धावा केल्या. तर ब्लेसिंग मुजरबानीने २ बळी घेतले. कर्णधार सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्रेंडन मावुता यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिका 4-1 अशी खिशात घातली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात 2 बदल करण्यात आले होते. कर्णधार गिलने वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि रियान पराग यांना संघात संधी दिली. तर रुतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांना शेवटच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते.