कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख आणि हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज (१५ जुलै) सकाळी सातच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग व सामाजिक वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे.
कॅम्लिन ही रंग व कला साहित्याच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन करते. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे या कंपनीची धुरा वाहिली. कॅम्लिन हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून पुढं आणण्यात सुभाष दांडेकर यांचा मोठा वाटा होता.
बाजारात स्पर्धा करत असताना दांडेकर यांनी कधीही उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिले.
सुभाष दांडेकर यांनी काही काळ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने राज्यातील व्यापार व उद्योगाच्या वाढीसाठी अनेक नवे उपक्रम सुरू केले होते. .