विशाळगडावरील अतिक्रमण काढले जावे यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली आहे. यासाठी काल त्यांनी गडावर जाण्याचा निर्धार केला. दरम्यान त्याआधी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता हिंसाचार प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या हिंचाराचामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशाळगड हिंसाचार प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान विशाळगडावरील या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशाळगडाला भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री विशाळगडाच्या पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. विशाळगडावरील घटनेची माहिती मिळताच ते कोल्हापुरात दाखल झाले.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी घेऊन काही शिवभक्त गडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दुसरीकडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे गडावरील व गडाखाली तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. कालच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.