पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan ) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
पीटीआय हा पाकिस्तानातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी आज सांगितले की, सरकार देशविरोधी कारवायांच्या आरोपावरुन पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालणार आहे.
मंत्री अताउल्ला तरार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, कथित राष्ट्रविरोधी कारवायांसाठी पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या पक्षावर कारवाई करण्यासाठी सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. परकीय निधी प्रकरण, ९ मे रोजीची दंगल, सायफर एपिसोड आणि यूएसमध्ये मंजूर झालेला ठराव पाहता, पीटीआयवर बंदी घालण्यासाठी विश्वासार्ह पुरावे आहेत.
कारवाई मागील मुख्य कारण काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांच्या पक्षाला महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेल्या २० पेक्षा जास्त जागांसाठी पात्र असल्याचे घोषित करण्यात आले . त्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या नेतृत्वाखालील सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे पीटीआयला नॅशनल असेंब्लीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर सत्ताधारी आघाडी दोन तृतीयांश बहुमत गमावण्याची शक्यता आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाविषयी…
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी १९९६ मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची स्थापना केली होती. इम्रान खान हे २०१८ ते २०२२ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. यानंतर इम्रान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली होती.