कोकणात अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथे कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली आहे. गेले २४ तासांपासून ही दरड दूर करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावरील मलबा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरड बाजूला काढण्यात यश आले असून, मलबा बाजूला काढला जात आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ मदतीला आले आहे.
रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना परतीच्या प्रवासासाठी चिपळूण बस स्टॅन्डमधून २५, तर खेडमधून १५ एसटी बसेस जादा सोडण्यात आल्या आहेत. अडकलेल्या प्रवाशांना एसटी बसेस मुंबईला घेऊन निघाल्या आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील या तीनही जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला देखील बसला आहे. समुद्र देखील खवळला असून, मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदर्गला ओरेन अलर्ट तर पुणे, नागपूर, रायगड आणि गडचिरोली भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, तसेच नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकणात सध्या अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, महामार्गावर पाणी येणे अशा घटना घडत आहेत.