महिलांवर अत्याचार आणि बेकायदेशीर जमीन हडपल्याच्या बंगालमधल्या संदेशाखाली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) माजी नेता शेख शाहजहानशी संबंधित तीन जणांना नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना शुक्रवारपर्यंत कोलकाता मधील सॉल्ट लेक येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या तीन लोकांमध्ये शाहजहानचा धाकटा भाऊ शेख सिराजुद्दीन, त्याचा जावई राणा बाबू लष्कर आणि ड्रायव्हर-सह-सहाय्यक मारूफ मीर यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराजुद्दीनला चौकशीसाठी बोलावण्याची ही चौथी वेळ आहे. मागील तीन नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता ईडीने या वेळीही समन्सकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
शेख शहाजहान आणि त्याचा दुसरा भाऊ शेख आलमगीर हे आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याला प्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली, नंतर ईडीने ताब्यात घेतले. ईडीने शेख यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मासळी निर्यात व्यवसायाशी संबंधित दोन कॉर्पोरेट कंपन्यांचा शोध लावला आहे, त्यापैकी एक त्यांची मुलगी शेख सबिना आणि दुसरी सिराजुद्दीनच्या नावावर नोंदणीकृत आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग हिशोबाच्या पुस्तकांमध्ये दाखवण्यात आला होता, तर मोठा हिस्सा शेख आणि त्याच्या साथीदारांपर्यंत हवाला मार्गाने बांगलादेशात पोहोचला होता.
शेख शहाजहान आणि त्याच्या साथीदारांवर संदेशखाली परिसरातील जमीन बळजबरीने बळकावल्याचा आणि स्थानिक रहिवाशांवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे. जानेवारी २०२४ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी शेखच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यानंतर शेख शाहजहान फरार झाला आणि तब्बल ५५ दिवसानंतर फेब्रुवारीमध्ये पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला केंद्रीय एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याच्या प्रकरणात शाहजहांन शेख मुख्य आरोपी आहे.