सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देकील पाऊस सुरु आहे. दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात पहाटे ४ वाजता कृष्णा नदीचे पाणी शिरले. त्यानंतर नृसिंहवाडी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा पार पडला. या सोहळ्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला आहे.
श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा, दिगंबरा असा जयघोष करत भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. कृष्णा नदीच्या पाण्याने पहाटे ४ वाजता श्रींच्या पादुकांना स्पर्श केला आणि पाणी दक्षिण द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. मागील आठवड्यापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बरेचसे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा , कृष्णा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढले की कृष्णा नदीचे पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असतं. यंदा 16 जुलै रोजी पहाटे 4 वाजता नदीचं पाणी दत्त मंदिरात आले आहे. दक्षिणद्वार सोहळ्यानंतर भाविकांनी मंदिर परिसरात स्नान करण्यासाठी एकच गर्दी केली होती.