काल विशाळगड येथे झालेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील हे आज विशाळगडाकडे आले होते. यावेळी पांढरपेणी येथे प्रशासनाने त्यांना अडवले. पोलिसांनी या भागात जमावबंदी लागू केल्याने खासदार शाहू महाराजांना अडविण्यात आल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी पोलिसांनी पत्रकारांची देखील अडवणूक केल्याचे समजते आहे. यावेळी केवळ १५ लोकांसह विशाळगडावर जाऊ द्यावे अशी मागणी आमदार सतेज पाटलांनी केली .
विशाळगडाच्या पाहणी करणार असल्याचे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे ते आज विशाळगडाकडे रवाना झाले होत. मात्र त्यांना पांढरपाणी येथे रोखण्यात आले. नुकसाग्रस्त यांना शिधा देण्यासाठी आलो आहोत, ज्यांनी नुकसान केले त्यांना काहीच करत नाही. नुकसानग्रस्तांना मदत आणली आहे. केवळ आम्हा १५ लोकांना जाऊ द्या असे मागणी सतेज पाटलांनी केली.
विशाळगडावरील अतिक्रमण काढले जावे यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी हे अतिक्रमण काढावे अशी मागणी केली आहे. यासाठी काल त्यांनी गडावर जाण्याचा निर्धार केला. दरम्यान त्याआधी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता हिंसाचार प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या हिंचाराचामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशाळगड हिंसाचार प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान विशाळगडावरील या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशाळगडाला भेट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री विशाळगडाच्या पाहणी करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासन आणि पोलीस विभागाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. विशाळगडावरील घटनेची माहिती मिळताच ते कोल्हापुरात दाखल झाले.