वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करण्याऐवजी २८८ जागा लढवण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असून, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सर्वपक्षीय बैठकीत राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे ठरले होते. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र आलेले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि पत्र कधी पाठवणार आहेत हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. तसे जरांगे यांनी गरीब उमेदवारांना निवडणुकीत उभे केल्यास समाजाला न्याय मिळेल असे आंबेडकर म्हणाले आहेत.
.तिसऱ्या आघाडीच्या चर्चांबाबत विचारले असता आंबेडकर म्हणाले की, या चर्चांमध्ये तथ्य नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यामुळे तिसरी आघाडी ही एक डावपेच असू शकते. असा काही प्रस्ताव आल्यास भविष्यात त्यावर विचार केला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या मतांबाबत विचारले असता आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसची पाच मते फुटली आहेत, तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचीही मते फुटली आहेत. पाच मते काँग्रेसची आणि इतर दोघांची एक-एक मते फुटली आहेत, परंतु सर्व दोष काँग्रेसवर टाकला जात आहे. काँग्रेसने फुटलेल्या आमदारांवर काय कारवाई करणार याचा खुलासा करावा, असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भाष्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, आणि या मुद्द्यावर चर्चेला वेग आला आहे.