आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागा तीरी जमला आहे. चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. मात्र उत्तरप्रदेशतल्या हाथरस दुर्घटनेनंतर धडा घेत महाराष्ट्र प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत आहे. चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशातच आज दशमीला 10 ते 12 लाख भाविकांची मांदियाळी जमलेली दिसून येते आहे. पंढरपूरच्या नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक उतरल्याने ओव्हर पॅक झाले आहे. शेकडो दिंड्या रस्त्यावर उतरल्याने हरिनामाच्या गजरात पंढरी नागरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरात भक्तीचा आणि भक्तांचा महापूर आलेला आहे. त्यामुळे सारी पंढरी अवघ्या महाराष्ट्राला आषाढीच्या सोहळ्यात विठ्ठलमय करण्यास सज्ज झालेली दिसते आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.