वारकऱ्यांना लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आता जवळपास 18 ते 20 तास रांगेत उभे राहावे लागते.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात दर्शनासाठी टोकन पद्धत सुरु करण्यात येईल, अशी घोषणा आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 103 कोटींचा निधी जाहीर केला आहे , त्यामुळे आता वारकऱ्यांची दर्शनबारीतून सुटका होणार आहे.
तिरुपतीमध्ये टोकन सेवा सकाळी पाच वाजल्यापासून सुरू असते. त्यासाठी टोकन घेऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड दाखवून रांगेत उभे न राहता थेट दर्शन घेता येतं. तासंतास रांगेत उभं न राहता हे दर्शन घेता येते त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी किती पैसे भरावे लागणार, किती वेळ ही सुविधा असणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना केवळ दोन तासात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकन व्यवस्था केली जाणार आहे.
विशेष म्हणजे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी टोकन पद्धत सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच 103 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली. ग्रामविकास खात्यामार्फत हा निधी दिला जाणार असून त्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंढरपूरमध्ये मोठ्या चार वाऱ्या भरतात, त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरमध्ये येतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरमध्ये 1000 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे.