ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी २८८ जागा लढण्याची तयारी आहे. मात्र आघाडी असल्याने शिवसेना ९० जागांवर दावा करणार आहे. आम्ही आमच्या जागांचा अभ्यास पूर्ण केला आहे आणि महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी आपापल्या जागांचा अभ्यास करून संयुक्त बैठक घेण्याचे ठरवले आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक बीकेसीमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीत लढवल्या जाणाऱ्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, शिवसेना आणि युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आदी नेते उपस्थित होते.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून ९०-९०-९० फॉर्म्युलावर चर्चा सुरू आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्याचा विचार महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांनी केला आहे.उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत युती केली होती.
विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसोबत राहून पारंपारिक आणि ताकद असलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. मुंबई, कोकण आणि मराठवाडा हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात.शिवसेनेची आगामी निवडणूक तयारी जोरदार सुरू असून, महाविकास आघाडीची एकत्रित व्यूहरचना आखण्यासाठी पुढील बैठका होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.