लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काळजी करु नका. लवकरच याबाबत बातमी देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते.
गडकोट किल्ल्यांबाबत एक ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वारीच्या काळात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 20-20 तास रांगेत वारकरी असतात. त्यासाठी आता तिरुपती धर्तीवर दर्शन मंडप योजना मंजूर केली आहे. यासाठी 103 कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंढरपूरसाठी 1 हजार बेडचे हॉस्पिटल देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मी जे बोलतो ते करतो, आमच्याकडे प्रिंटिंग मिस्टेक नसते असा टोलाही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी लगावला. दूध , सोयाबीन , कांदा , कापूस हे सर्व विषय भविष्यात सोडवायचे आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. .
रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेच्या भल्यासाठीच काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जे समाजात विष पसरवण्याचे काम करतात त्यापासून सावध राहावे लागेल असेही ते म्हणाले. पंढरपूरसाठी मोठा आराखडा तयार करावा लागेल, यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊ असंही त्यांनी सांगितले . परत जाताना सुरक्षित वारी संपवून पोहोचा, तेव्हाच आम्ही समाधानी होऊ असेही एकनाथ शिंदे म्हणाले.