“सबका साथ सबका विकास” अशी घोषणा आता बंद करता असे म्हणत भाजपला अल्पसंख्याक आघाडीची गरज नसल्याचे प्रतिपादन पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी केले आहे .कोलकाता येथे आयोजित पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी म्हणाले की,” आधी मी राष्ट्रवादी मुस्लिमांबद्दल बोलायचो आणि भाजपने देखील “सबका साथ, सबका विकास”ची घोषणा दिली होती. परंतु,आता तसे म्हणणार नाही. ही घोषणा आता आपण बंद केली पाहिजे. त्याऐवजी जे आमच्या सोबत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे म्हंटले पाहिजे. भाजपला अल्पसंख्याक आघाडीची गरज नाही. ‘आम्ही जिंकू,आम्ही हिंदू वाचवू आणि संविधान वाचवू.’ असे म्हणत यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी जय श्री रामचा नारा दिला आणि कार्यकर्त्यांनीही टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला 6 जागांचे नुकसान सहन करावे लागले आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकणाऱ्या भाजपची संख्या यावेळी 12 झाली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे सुवेंदू अधिकारी देखील लोकांच्या रडारवर आहेत कारण तिकीट वाटपात सुवेंदू अधिकारी यांना खूप महत्त्व देण्यात आल्याचा आरोप आहे.
याउलट लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने उत्तम कामगिरी करत लोकसभेच्या 29 जागा जिंकल्या. याशिवाय बंगालमधील 4 जागांवर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही टीएमसीने विजय मिळवला आहे. तेव्हापासून सुंवेंदू अधिकारी यांनी तृणमूलला लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत 50 लाख हिंदूंना मतदान करू दिले जात नसल्याचा आरोप अधिकारी यांनी नुकताच केला होता. बंगालमध्ये लोकशाही मृत झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.