लोकसभा निवडणुका होऊन महिना झाला नाही तेच आता हरियाणा राज्यात देखील विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीत फारशी जादू केली नाही. मात्र आता हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षही लढणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंजाबचे मुख्यमंत्री मान म्हणाले की, आम आदमी पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निवडणुकीत पक्ष अन्य कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाही.
भगवंत मान म्हणाले, ”हरियाणा हे असेच एक राज्य आहे, जिथे जनतेने सर्वच पक्षांना संधी दिली. हरियाणातील जनतेनेही भाजप आणि काँग्रेसची सरकारे पाहिली आहेत. पण खेदाची गोष्ट म्हणजे कोणताही पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. मान म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे आहेत. अशा परिस्थितीत हरियाणातील जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक साम्य असल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणातील निम्मे लोक पंजाबी बोलतात.”
20 जुलै रोजी आम आदमी पार्टी हरियाणासाठी केजरीवाल यांची हमी देणार आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही यावेळी उपस्थित राहणार आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने राज्यातील 46 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते परंतु त्या सर्व जागेवर आपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, काँग्रेससोबत युती करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकमेव जागेवर पक्षाची निराशा झाली. आता ‘आप’ पुन्हा विधानसभा निवडणूक लढवत आहे.