गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने चांगलाच जोर लावलेला दिसत आहे. आज मात्र पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावे असे हवामान खात्याने सुचवले आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर हवामान विभागाकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या आठवड्याच्या सुरूवातीला राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुणे शहरासह घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.तसेच पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसर क्षेत्रात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.