वादग्रस्त IAS पूजा खेडकर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. आपल्या अनेक कारनाम्यांमुळे पूजा खेडकर या चर्चेत आल्या आहेत. दरम्यान आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच UPSC ने वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचे आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करणे याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. या प्रकरणात अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप होता. याबाबतची तक्रार पुणे एसीबी कार्यालयातही करण्यात आली आहे. बुधवारी पुणे एसीबीने खेडकर कुटुंबीयांच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकरचे वडील सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन प्रशासकीय अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जमिनीही खरेदी करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या वादातूनच पुण्यातील दौंड पोलिस ठाण्यात पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध शेतकऱ्यांसमोर पिस्तुल उगारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूजा खेडकरच्या आईला म्हणजेच मनोरमाँ खेडकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांना २० जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या त्रासात सातत्याने वाढ होत आहे. यूपीएससी परीक्षेतील गैरप्रकारांमुळे वादात सापडलेल्या पूजा खेडकरच्या घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने खेडेकरांच्या घराबाहेरील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. खेडकर कुटुंबाचा बंगला पुण्यातील बाणेर भागात आहे. बंगल्याच्या सुशोभिकरणासाठी फूटपाथवर अतिक्रमण करण्यात आले होते. महापालिकेने यापूर्वी बेकायदा बांधकामे हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र पुणे महापालिकेला कुटुंबाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बुलडोझरद्वारे अतिक्रमण हटवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पूजा खेडकरच्या अपंग प्रमाणपत्राबाबत नवा खुलासा समोर आला आहे. अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांनी दिलेला पत्ता हा कारखान्याचा पत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड असणे आवश्यक असताना पूजाने रेशनकार्डसाठी अर्ज केला होता आणि तिचे उत्पन्न ५ लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते.