पुण्यात दिवसेंदिवस झिकाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पुण्यात झिकाच्या संसर्गाचे आणखी तीन रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.त्यात एका ३३ वर्षीय गर्भावतीसह दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या २७ पर्यंत वाढली असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
नव्याने आढळलेल्या तीन रुग्णांमध्ये कर्वेनगरमधील ३३ वर्षीय गर्भवती, कोथरूडमधील ७८ वर्षीय आणि औंध भागातील ८४ वर्षीय अशा पुरुषांचा समावेश आहे. झिकाच्या विषाणूंचा संसर्ग झालेली ३५ आठवड्यांची गर्भवती आहे. तिच्या गर्भातील बाळावर झिकाच्या संसर्गाचा कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याचे अहवालातून पुढे आले असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. झिकाचे निदान झालेल्या औंध भागातील ज्येष्ठ नागरिकाला मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा सहव्याधी आहेत.
शहरात आतापर्यंत आढळलेल्या झिकाच्या रुग्णांमध्ये ११ गर्भवती आहेत. शहरातील २३ रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. त्यांना उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. त्यांच्या लक्षणांच्या आधारावर उपचार केल्याची माहिती महापालिकेने दिली. आतापर्यंत निदान झालेल्या ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले. उर्वरित तीन रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे तिन्ही रुग्ण ज्येष्ठ नागरिक असून ते हडपसर, कोथरूड आणि औंध भागातील नागरिक असल्याचे महापालिकेने सांगितले.
झिकाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डासांचा उद्रेक नियंत्रित करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यात आले असून, आपली सोसायटी, कार्यालय, घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही, त्यात डासांची पैदास होणार नाही, याची प्रकर्षाने खबरदारी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे.