आसाम सरकारने मुस्लिम समाजाच्या विवाहाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत सरकारने आसाम रिपील बिल 2024 च्या माध्यमातून आसाम मुस्लिम विवाह, घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणले जाईल. इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना, आसाम सरकारचे सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी इत्यादी मंत्री जयंत मल्लाबरुवा म्हणाले की, सरकारने बालविवाहाविरूद्ध अतिरिक्त सुरक्षा उपाय करून आपल्या मुस्लिम मुली आणि बहिणींना न्याय सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आसाम रिपील बिल 2024 द्वारे आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि नियम 1935 रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आसाम प्रदेश भाजपचे अध्यक्ष भावेश कलिता यांनी मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विषयावरील मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भातील पोस्ट रिट्विट करताना, या निर्णयाचे कौतुक केले आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आसाम सरकारचे दोन मंत्री दर महिन्याला आसामच्या बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांना भेट देतील, असा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तेथे गेल्यानंतर दोन्ही मंत्री तीन दिवस मुक्काम करतील. खासदार, आमदार आणि विभागीय अधिकारी तसेच स्थानिक मान्यवरांच्या बैठका घेऊन स्थानिक पातळीवरील समस्या सोडवू. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री जन आरोग्य योजनेसह विविध योजनांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.