अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने हरियाणात होत असलेल्या अवैध खाणकामावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने सोनीपतमधून काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवारला अटक केली आहे. काँग्रेस आमदारावर यमुनानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केल्याचा आरोप आहे. पनवार यांच्या मुलालाही ईडीच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पनवार यांच्या आस्थापनांची ईडीकडून गेल्या अनेक महिन्यांपासून चौकशी सुरू आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणी यमुनानगरचे माजी आमदार आणि INLD नेते दिलबाग सिंह यांनाही ईडीने अटक केली आहे. सुरेंद्र पनवार आणि दिलबाग सिंग यांची प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत.
सुरेंद्र पनवार यांचा हरियाणा तसेच राजस्थानमध्ये खाण व्यवसाय आहे. सुमारे 7 महिन्यांपूर्वी ईडीच्या टीमने त्याच्या सोनीपतमधील सेक्टर-15 येथील निवासस्थानावर छापा टाकला होता. सुरेंद्र पनवारच्या अटकेबाबत ईडीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ईडीला सुरेंद्रविरोधात मनी लाँड्रिंगबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले होते.
छाप्यादरम्यान, ईडीने 5.29 कोटी रुपये रोख, 1.89 कोटी रुपयांचे सोने, 2 वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी कागदपत्रे जप्त केली. याशिवाय परिसरातून अवैध शस्त्रे, दारूगोळा आणि जादा दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे. वास्तविक, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या म्हणजेच एनजीटीच्या आदेशाच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. तपासादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना यमुनानगर जिल्ह्यातील खनिजांचे अवैध उत्खनन आणि विक्रीची माहिती मिळाली. यामध्ये योग्य ई-वे बिल तयार न करण्यासाठी किंवा ओळख टाळण्यासाठी बनावट कागदपत्रांचाही वापर करण्यात आला.