दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल कथित दारू घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. अशा परिस्थितीत केजरीवाल यांच्या प्रकृतीचा वाद वाढत चालला आहे. नायब राज्यपालांचे प्रधान सचिव व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केलेल्या अटकेला आणि ट्रायल कोर्टाच्या सीबीआय कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सीबीआय प्रकरणात केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर २९ जुलै रोजी सुनावणी करण्याचे आदेश दिले.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.परंतु, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातच राहणार आहेत. केजरीवाल यांना 20 जून रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला होता. परंतु, 21 जून रोजी ईडीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर 25 जून रोजी सुनावणी झाली. तेव्हा ईडीने हायकोर्टात सांगितले होते की, ट्रायल कोर्टाने आमची बाजू नीट ऐकून घेतली नाही.
एलजी कार्यालयाने आरोप केला आहे, ”अरविंद केजरीवाल जाणूनबुजून कॅलरी कमी करण्यासाठी कमी आहार घेत आहेत आणि कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करत आहेत. ज्यामुळे त्यांचे वजन कमी होत आहे. पत्रात असे म्हटले आहे की केजरीवाल यांनी 6 जून ते 13 जुलै दरम्यान योग्य आहार घेतला नाही, ते आहार चार्टचे पालन करत नाहीत. तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांनी केजरीवाल यांच्या आरोग्यासंबंधीचा अहवाल एलजी कार्यालयाला पाठवला होता, ज्यामध्ये केजरीवाल जाणूनबुजून कमी कॅलरी आहार घेत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यात डॉक्टरांनी दिलेल्या डाएट चार्टचे पालन न करणे असे सांगण्यात आले. ” अहवालात असे लिहिले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय इतिहासानुसार त्यांना टाइप-२ मधुमेह आहे. कमी उष्मांक आहार घेतल्याने त्याच्या वजनात लक्षणीय घट झाली असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ईडीने केजरीवाल यांच्यावर मिठाई आणि आंबा खाल्ल्याचा आरोपही केला होता. केजरीवाल यांची साखरेची पातळी वाढवून वैद्यकीय सवलतीच्या आधारे जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे ईडीने म्हटले होते.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या प्रकरणावर पोस्ट करून एलजीवर निशाणा साधला. ते म्हणाले, एलजी साहेब काय जोक करताय? माणूस रात्री साखर कमी करेल का? जे खूप धोकादायक आहे. एलजी साहेब, तुम्हाला या आजाराची माहिती नसेल तर तुम्ही असे पत्र लिहू नये. देवा, अशी वेळ तुमच्यावर कधी येऊ नये.”