NEET UG पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. एनटीएने केंद्र व शहरनिहाय निकाल वेबसाइटवर अपलोड केला आहे. विद्यार्थी NTA च्या अधिकृत वेबसाइट https://exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन निकाल पाहू शकतात.
18 जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय निकाल ऑनलाइन अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. विद्यार्थ्यांची ओळख उघड करू नये असेही सांगण्यात आले. न्यायालयाने परीक्षा देणाऱ्या एजन्सीला आज दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर NTA ने निकाल जाहीर केला आहे. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय 22 जुलै म्हणजेच सोमवारी सुनावणी करणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालय परीक्षा रद्द करते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकार आणि एनटीएने न्यायालयात म्हटले आहे ,सं”पूर्ण परीक्षेच्या अखंडतेवर कोणताही परिणाम झाला नाही. काही केंद्रांवरच अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करू नये. सीबीआयनेही या प्रकरणी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. आता सर्वांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.”
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) आणि अंडर ग्रॅज्युएट (UG) पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने रांचीमध्ये मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने गुरुवारी रात्री रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) च्या वसतिगृहातून एमबीबीएस प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सुरभी कुमारीला ताब्यात घेतले आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरभी कुमारी ही सॉल्व्हर गँगमध्ये सामील आहे. ती रामगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. रांचीमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. या विद्यार्थिनीला पाटण्यात अटक केल्यानंतर तिचे नाव समोर आले आहे. झारखंडमधील वैद्यकीय महाविद्यालयातून या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. सीबीआय या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संजीव मुखियापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी काही वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर सीबीआयच्या निशाण्यावर आहेत.