Kamala Harris : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रविवारी जाहीर केले की ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेत आहेत. त्यांच्या जागी त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. कमला हॅरिस या सध्या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती आहेत.
जो बायडेन यांनी X वर पोस्ट करून कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला आहे. पोस्ट शेअर करत म्हटले, ‘मी कमला हॅरिस यांना या वर्षी आमच्या पक्षाचा उमेदवार बनवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देऊ इच्छितो. डेमोक्रॅटिक पक्षाने एकत्र येऊन ट्रम्प यांचा पराभव करण्याची वेळ आली आहे’. कमला हॅरिस या सध्या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती आहेत. त्यांना ‘फिमेल ओबामा’ असेही म्हणतात. कमला हॅरिस या अमेरिकेत खूप प्रसिद्ध आहेत.
कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला, पहिल्या भारतीय, पहिल्या कृष्णवर्णीय उपराष्ट्रपती बनून इतिहास रचला. ‘फीमेल ओबामा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हॅरिस याही पहिल्यांदाच सिनेटच्या सदस्य झाल्या. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांच्या विजयानंतरच्या एका ऐतिहासिक भाषणात, त्या म्हणाल्या होत्या उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या कदाचित पहिल्या महिला असतील, पण त्या शेवटच्या नसतील.
कमला हॅरिस यांचे भारताशी संबंध
कमला देवी हॅरिस, जन्म 20 ऑक्टोबर 1964, आई श्यामला गोपालन, 1960 मध्ये तामिळनाडू, भारतातून UC बर्कले येथे आल्या, तर तिचे वडील डोनाल्ड जे. हॅरिस ब्रिटिश जमैकामधून 1961 मध्ये UC बर्कले येथे अर्थशास्त्रात पदवी शिक्षण घेण्यासाठी आले. येथेच त्यांच्या अभ्यासादरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कमला हॅरिस यांचे शिक्षण
कमला हॅरीस यांनी हाॅवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले. हाॅवर्डनंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी अल्मेडा काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी (DA) कार्यालयात आपल्या कायद्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००३ मध्ये त्या सॅन फ्रान्सिस्कोची सिटी ॲटर्नी बनल्या. त्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या. कमला हॅरीस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या.
राजकीय प्रवास
2016 मध्ये हॅरिस यांनी कॅलिफोर्नियामध्ये सिनेटची निवडणूक लढवली आणि सहज जिंकल्या. शपथ घेतल्यापासून दोन वर्षांत डेमोक्रॅटिक पक्षात महिला स्टार म्हणून उदयास आल्या. 2020 मध्ये, बायडेन यांनी विजयासह त्यांना उपाध्यक्ष केले. आता 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत, बायडेन यांनी हॅरिस यांना त्यांच्या जागी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होण्यासाठी पाठिंबा दिला आहे.