राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र जुलै महिन्यात पाऊस सर्वत्र चांगलीच हजेरी लावत आहे. कोकण, मुंबई आणि उपनगरात तर अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरणीची कामे अनेक ठिकाणी सुरू झाली आहेत. तर आज देखील हवामान विभागाने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच मुंबई, उपनगर, पुणे आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांमध्ये मुबंईत अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळतोय.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावे असे हवामान खात्याने सुचवले आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर हवामान विभागाकडून पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या आठवड्याच्या सुरूवातीला राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुणे शहरासह घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.तसेच पुणे शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसर क्षेत्रात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.