Gold Rate : मंगळवारी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 4 टक्के कमी केली आणि आता सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी 10 टक्के वरून 6 टक्के करण्यात आली.
या घोषणेनंतर काही वेळातच सोन्याचा भाव घसरला. यावेळी सोने ४ हजार रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंग दरम्यान, मंगळवारी सकाळी सोने 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. नंतर कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा होताच, मोठी घसरण पाहायला मिळाली आणि सोने 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
या काळात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 4,350 रुपयांनी कमी झाला. याआधी सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ७२,७१८ रुपयांवर बंद झाला होता.
एकीकडे अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव कमी झाले, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण सुरू झाली आणि सोन्याप्रमाणे चांदी देखील 4,740 रुपयांनी स्वस्त झाली आणि 84,275 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहचली.
अर्थमंत्र्यांनी काय घोषणा केली?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 6 टक्के केली आहे. यामध्ये बेसिक कस्टम ड्युटी 5 टक्के, ॲग्री इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट सेस 1 टक्के आहे. याशिवाय प्लॅटिनमवरील शुल्क आता 6.4 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार आयात केलेल्या दागिन्यांवर कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के पर्यंत कमी केले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किंमती देखील कमी होऊ शकतात आणि सोन्याची मागणी वाढू शकते.