अमरनाथ गुहा मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येने सोमवारी चार लाखांचा आकडा पार केला. सोमवारी, 12,000 हून अधिक भाविकांनी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. अमरनाथ यात्रेतील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी 12,539 यात्रेकरूंनी प्रवास करून दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी वार्षिक यात्रेच्या सलग 24 व्या दिवशी बाबा भोलेनाथचे दर्शन घेतले. अधिकारी पुढे म्हणाले, 3,880 मीटर उंचीच्या गुहा मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या आता 4,08,518 वर पोहोचली आहे. गुहा मंदिरात पूजा करणाऱ्यांमध्ये 7,760 पुरुष यात्रेकरू, 2,772 महिला यात्रेकरू, 175 साधू आणि एक साध्वी यांचा समावेश आहे. 1,600 हून अधिक सुरक्षा दल आणि 174 मुलांनीही तीर्थयात्रा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या यात्रेत दोन मृत्यू झाले आहेत, ज्यात हरियाणातील एक सेवादार आणि झारखंडमधील एका यात्रेकरूचा समावेश आहे. जूनमध्ये बालटाल रोडवर दोघांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. 52 दिवस चाललेल्या यात्रेची 19 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. गेल्या वर्षी, 4.5 लाखांहून अधिक भाविकांनी गुहा मंदिरात प्रार्थना केली होती.
अमरनाथ यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येत असतात. अनेक किलोमीटर पायी जाऊन ते बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेत असतात. अनेकदा दुष्ट दहशतवादी अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे दरवर्षी अमरनाथ यात्रा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत भारतीय सैन्य दल आकाशात आणि जमिनीवर अखंड पहारा देऊन भाविकांची सुरक्षा करत असते. डोळ्यात तेल घालून आपले शूर जवान भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.