कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला पाह्यला मिळतोय. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेला देखील बस्तान दिसत आहे. राज्यातील बहुतांश नद्या या दुथडी भरून वाहत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. दरम्यान आजही राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज कोणत्या भागात कसे हवामान असेल त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अति ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. दरम्यान आज सकाळपासूनच मुंबई, उपनगर, पुणे आणि कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांमध्ये मुबंईत अति ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडताना पाहायला मिळत आहे. पावसामुळे लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळतोय.
कालपासून पुणे शहरात आणि खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण जवळपास भरले असून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सातारा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावे असे हवामान खात्याने सुचवले आहे. तर कोकणातही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.